न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २८ जाने.) :- भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरी एमआयडीसी येथील बालाजीनगर परिसरात पिंपरी चिंचवड विकास आघाडी आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने लहान मुलांची ‘स्वच्छ भारत’ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात अपंग व परिसरातील मुलांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभाताई उबाळे, विश्वनाथ टेमगिरे, इस्माईल नदाफ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी पहिल्या पाच विजेत्या मुलांना बक्षीसे देण्यात आली. भोर म्हणाले की, परिसर जरी झोपडपट्टी भागातील असला, तरी येथील बरेच विद्यार्थी हे कर्तुत्ववान आहेत. त्यांच्या कर्तुत्वाला योग्य संधी मिळावी, म्हणून या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आहे. तसेच इथून पुढे या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास पिंपरी चिंचवड विकास आघाडी पुढाकार घेईल.
या मुलांना इंग्लिश स्पीकिंग क्लासेस व इतर काही शिक्षणाच्या अडचणी असल्यास, त्यासुद्धा प्रयत्नातून सोडविण्यात येतील, असे माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इस्माईल नदाफ, करण शिंदे, अकबर नदाफ व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.















