न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- पिंपरी चिंचवड मनपाने प्रभाग क्रमांक १४ मोहननगर व काळभोरनगर परिसरातील विकासकामांसाठी आरक्षित असलेल्या जमिनी त्वरित ताब्यात घ्याव्यात. तसेच त्या विकसित कराव्यात, अशी मागणी शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेने प्रभाग १४ मधील विविध विकासकामांसाठी जागा आरक्षित केलेल्या आहेत. यातील काही जागा पालिकेच्या ताब्यात आहेत. या आरक्षित जागांवर गर्भनिदान रुग्णालय, खेळाचे मैदान, भाजी मंडई, उद्यान आदींचा समावेश आहे. परंतु, अद्यापपर्यंत महापालिकेकडून आरक्षित जागांचा ताबा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रभागातील विविध विकासकामे खोळंबली आहेत. प्रभागातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेने तात्काळ या आरक्षित जागांचा ताबा घेऊन, आरक्षणे विकसित करण्याकरीता पाऊले उचलावीत. जेणेकरून नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल व आरक्षणाचा मुख्य उद्देश साध्य होईल. आयुक्तांनी याबाबत कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना आपले आस्तित्व दाखवून देईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.















