- श्री कृपेच्या अवकृपेमुळे कोरोना योद्ध्यांची उपासमार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(पिंपरी दि. १७ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव हॉस्पिटलमधील ३०० कर्मचाऱ्यांचा पगार मागील दोन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे सर्व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामावर असून या हॉस्पिटलचे कामकाज श्री कृपा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. या कंपनीमार्फत सर्वांची नेमणूक करण्यात आली आहे.
वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, फार्मासिस्ट, परिचारिका, टेक्नीशियन, टेक्निशियन सीएम, एसडी टेक्निशियन, टेक्निशियन ब्लड बैंक व इतर अनेक जणांची नियुक्ती संबंधित एजन्सीतर्फे केली जाते. लॅब या सर्वांचे हजेरी पत्रक व कामकाज अहवाल पाच तारखेपर्यंत उपलब्ध करून द्यावा लागतो. तसेच, दहा तारखेपर्यंत सर्वांचे पगार देण्यात यावे, असे लेखी पत्र संबंधित संस्थेला पालिकेने देऊन सुद्धा त्यांचे पगार वेळेवर केले जात नाहीत. त्यामुळे पालिकेच्या लेखी पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
कोरोना महामारीमध्ये आपला जीव धोक्यात घालून चांगले काम करून सुद्धा जर पगार वेळेत मिळत नसेल तर काम करून उपयोग काय? असा सवाल कर्मचारी विचारत आहेत. आमच्या घराचे हप्ते थकलेले आहेत. घरात किराणा नाही, मुलांच्या शाळेची फी भरायची आहे हे सर्व आमच्या पगारावर चालते आणि आम्हाला जर दोन – दोन महिने पगार मिळत नसेल तर आम्ही जगायचे कसे असा प्रश्न कर्मचारी विचारीत आहेत. एका बाजूला सरकार कोरोना योद्धांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाबद्दल आदर व्यक्त करते. तर दुसऱ्या बाजूला त्यांना दोन – दोन महिने पगार मिळत नाही हा विरोधाभास दिसून येत आहे.