न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. ३० जाने.) :- शालेय जीवनातील वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळतो. तसेच उद्याचा कलाकार या संमेलनातून निर्माण होतो. त्यामुळे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असतात, असे प्रतिपादन बालसाहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक ज्योतिराम कदम यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, आकुर्डी येथील मराठी माध्यमाच्या ‘शिशुविहार’ शाळेने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार अध्यक्षस्थानी होते.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक कुसाळकर आर. आर, अंजली फर्नांडिस, विशेष कार्य अधिकारी एन. के. निंबाळकर, संस्थेच्या शिवणे शाखेचे मुख्याध्यापक आर. एस. पवार, माजी मुख्याध्यापक अंजली पालांडे व इतर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जागरण गोंधळ, शेतकरी नृत्य, शिवबा माझा मल्हारी, मंगळागौर, कोकणी नृत्य, जुनी गीते, भारूड, सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी नटसम्राट व बळीराजावर नाटक सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
शिशुविहार प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका शैला गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळेने वर्षभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, कला यांसारखे उपक्रम सुरू केले आहेत. त्याअंतर्गत बाबा आमटे यांच्या आनंदवनाला विद्यार्थ्यांनी जीवनोपयोगी वस्तू, कपडे भेट दिलेल्या आहेत.
विद्यालयातील शिक्षिका वर्षा नलवडे व उपशिक्षक प्रकाश कदम यांनी सूत्रसंचालन केले. नंदकिशोर ढोले यांनी आभार मानले. विकास गायकवाड, कविता रोडे, सुरेखा नलावडे, माधवी भोसले, दिपाली मोहिते, सचिन ढेरंगे यांनी आयोजन केले होते.











