- पालिका आयुक्तांची सहमती आवश्यक; राज्याचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावी असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसंच निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असंही स्पष्ट केलं आहे. पालकांची समंती आवश्यक असून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
शाळेत जाऊन १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत असं स्पष्ट केलं आहे. महत्वाचं म्हणजे शाळा किंवा महाविद्यालय सुरू करताना स्थानिक करोना परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांवर मुख्य जबाबदारी असेल.











