- प्रारूप प्रभागरचना आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२२) :- महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभागरचना जाहीर होताना यावेळेस आरक्षण सोडत जाहीर होणार नाही. इतर मागासवर्ग आरक्षणासंबंधीची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने आधी प्रभागरचनेची प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर आरक्षण सोडत जाहीर करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्याकडे असलेली आकडेवारी मागासवर्ग आयोगाला द्यावी, आयोगाने ही आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य शिफारशी राज्य निवडणूक आयोगाला कराव्यात असे आदेश दिले आहेत. यासर्व प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. मात्र, त्यासाठी निवडणूक आयोगाला पालिका निवडणुकीची प्रक्रिया थांबवता येणार नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना आणि आरक्षण निश्चिती यासंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशात आता बदल करून सुधारित आदेश दिले आहेत. त्यानुसार आता प्रारूप प्रभागरचना जाहीर होऊन त्यावर हरकती सूचनांची कार्यवाही झाल्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानुसार महापालिकांनी कार्यवाही करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी गुरुवारी (दि. २७) दिले आहेत. त्यामुळे यावेळेस पहिल्यांदाच प्रभागरचना जाहीर होताना आरक्षण सोडत निघणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभाग रचना ३१ जानेवारीला? महापालिकेने केलेली प्रारूप पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. साधारणपणे येत्या सोमवारी (दि. ३१) किंवा मंगळवारी (दि . १) ही रचना जाहीर होईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रभागरचना जाहिर झाल्यास इच्छुकांना त्यानुसार काम करून मतदारांशी संपर्क वाढविता येणार आहे.
















