- तूर्तास इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२२) :- बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेली प्रभाग रचना जाहीर झाली. आता घडधड आरक्षण जाहीर होण्याची आहे. त्यानंतरच कोणत्या विद्यमानाला पुन्हा लढता येईल आणि कोणाला घरी बसावे लागेल. कोणत्या इच्छुकाला संधी मिळेल या सगळ्याचे पत्ते उलगडले जाणार आहे. तुर्तास प्रभाग रचनेवर राज्यातील सत्तेच्या विरोधकांची अंतर्गतरित्या आगपाखड आणि सत्ताधाऱ्यांचे समर्थन हेच सध्या पहायला मिळत आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग हा कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. अपवाद या आधी आरक्षणे जाहीर होऊन जवळपास प्रभाग रचना काहीच दिवसांच्या अंतराने होत असे. त्यामुळे आपल्याला कोठून लढण्यासाठी संधी आहे, याचा अंदाज विद्यमान आणि इच्छुकांना येत असे. परंतु आता प्रत्यक्षात प्रभाग तोडला, यापेक्षा आता आरक्षणे काय पडतील याची धाकधूक अनेक दिवस राहणार आहे. आरक्षणे जाहीर होण्याविषयी अद्याप कोणतेच संकेत राज्य सरकारकडून मिळाले नाहीत त्यामुळे ही धाकधूक किती दिवस राहणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी ‘ वेट अँड वॉच ‘ न करता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
२०२२ मधील निवडणुकीसाठी तीन सदस्यीय ४६ प्रभाग आहेत. प्रभाग रचनेत पिंपरी – चिंचवड शहरातील दिघी – बोपखेल प्रभाग क्रमांक ६, चर्होली, प्रभाग क्रमांक ५ आणि वैदुवस्ती प्रभाग क्रमांक ४१ या तीन प्रभागांत प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीच्या (एसटी) उमेदवारांसाठी राखीव असणार आहे. तर, अनुसूचित जातीसाठी (एससी) २२ प्रभागांतील प्रत्येकी १ जागा त्या वर्गाच्या उमेदवारासाठी आरक्षित असणार आहे. खुला गटासाठी ११४ प्रभाग असणार आहेत. बहुमतासाठी एससी आणि एसटीतील २५ जागा ज्याच्या पदरात पडतील त्याला सत्तेची चढाई आणखी सोपी होईल, असे चित्र दिसते.


















