- ३० बॉम्ब सदृष्य वस्तू झोपड्यांमधून जप्त; दोनजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- वडमुखवाडी येथे अलंकापुरम रोडवर गाईच्या गोठ्यात शनिवारी (दि. ५) सकाळी पावणे बाराच्या सुमारास बॉम्ब सदृश वस्तूचा स्फोट झाल्याने एका मुलीचा मृत्यू होऊन दोन मुले जखमी झाली होती. याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर ३० बॉम्ब सदृष्य वस्तू जवळच असलेल्या झोपड्यांमधून जप्त केल्या आहेत.
प्रदीप मारेझोरे चव्हाण (वय ३४), गरीबदास बली चव्हाण (वय ३५, रा. दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राधा गोकुळ गवळी (वय ५) हिचा शनिवारी (दि. ५) मृत्यू झाला होता. आरती गोकुळ गवळी (वय ४), राजेश महेश गवळी (वय ४) हे दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई चेतन साळवे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी सुपारी एवढ्या आकाराची त्यावर धाग्याने गुंडाळलेली बॉम्बसदृश वस्तू निष्काळजीपणे वापरली.
आरोपींनी हयगयीने, जाणूनबुजून या बॉम्बसदृश वस्तू उघड्यावर टाकून दिल्या. मयत मुलगी राधा तिची लहान बहीण आरती आणि चुलत भाऊ राजेश हे घराजवळ खेळत असताना त्यांना या बॉम्ब सदृश वस्तू आढळल्या. खेळण्याची वस्तू समजून राधाने ती वस्तू हातात घेतली. तिच्यावर दाब पडल्याने वस्तूचा भीषण स्फोट झाला. यात राधाचा मृत्यू झाला तर तिची लहान बहीण आणि चुलत भाऊ जखमी झाल्याचे फियादीत म्हटले आहे. डुकरे मारण्यासाठी या बॉम्ब सदृष्य वस्तूचा वापर केला जात असल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


















