- स्वतंत्र स्वच्छतागृहासह रोजगार व ओळखपत्रासाठी एक खिडकी योजना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांच्या समस्या व प्रश्न जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत नागरवस्ती योजना विभागाच्या मदतीने कल्याणकारी योजनांसाठी तसेच आधारकार्ड काढणे, मतदार यादीत नाव नोंदविणे आदी सुविधांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील भिकारी, बेघर व तृतीयपंथींचे पोलिस व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्या अंतर्गत तृतीयपंथींयां च्या प्रतिनिधींची सावित्रीबाई फुले स्मारक इमारतींमध्ये नुकतीच बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पालिका व पोलिस अधिकारी व तृतीयपंथींचे सुमारे ७० प्रतिनिधी उपस्थित होते.
नागरी विकास योजना विभागाच्या वतीने त्यांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, त्यांच्या आरोग्यासंदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा विचार आहे. त्यांच्यासाठी शहरात स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. तृतीयपंथी ज्या भागात जास्त संख्येने राहतात, त्या भागातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही करणार येणार आहे. तृतीयपंथींसाठी महापालिकेच्या वतीने रोजगार प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हिंग व इतर प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोजगारांसाठी त्यांना सहाय्य व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.











