- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये श्रद्धांजली सभा संपन्न…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२२) :- भारतरत्न तथा गानसम्राज्ञी लता मंगेशकर या भारतातील एक महान आणि सर्वोच्च प्रतिभाशाली गायिका होत्या. मराठी, हिंदी तसेच अनेक भाषांतील त्यांनी गायलेली हजारो गीते मंत्रमुग्ध करणारी आणि त्यांची आठवण सदैव जागृत करणारी ठरेल. लतादीदींनी भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केलेली होती. त्यात प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गाण्यांचा समावेश होता. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला, अशा शब्दात चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपाध्याक्ष सौ. अनिताताई संदीप काटे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. ६) रोजी दु:खद निधन झाले. पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या मुख्य इमारतीत शाळेच्या वतीने श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. लतादीदींच्या प्रतिमेस सौ. अनिताताई काटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सौ. निहाराताई काटे यांनी आपल्या भाषणात लतादीदींच्या आठवणी सांगितल्या.
यावेळी शाळेचे संस्थापक संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, प्री प्रायमरी विभाग प्रमुख पलक गांधी, समन्वयक अर्पना सरवटे, वैशाली गांधी व सुचिता करंजवाला यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी शिक्षक वर्गातर्फे दीप्ती बक्षी, सीमा सरदेसाई, सेजल पाटील, प्रीती तळेकर, माणिक कुलकर्णी, आदिती चितळे, प्रिया भोंडे, सुलक्षणा फुलारी, प्रांजली देशपांडे आणि सायली पवार आदी उपस्थित होते.











