- पिंपरीतील भाजप कार्यालयासमोर शहर कॉंग्रेसचे आंदोलन….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- देशाचे संसद भवन म्हणजे १३० कोटी जनतेचे पवित्र मंदिर आहे. या पवित्र ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणारे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदार, आमदार आणि राज्यातील महापालिकेतील भाजपा नगरसेवकांमध्ये महाराष्ट्राविषयी जर स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा निषेध करीत तात्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषण करताना महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षामुळे देशभर कोरोनाचा फैलाव झाला असे वक्तव्य केले. त्यामुळे देश भरातील कॉंग्रेस प्रेमींमध्ये आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पिंपरी, मोरवाडी येथिल भाजपा कार्यालयासमोर बुधवारी (दि. ९ फेब्रुवारी) जमले होते.
यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सायली नढे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यु दहितुले, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, ॲड. उमेश खंदारे आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला.












