न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर तब्बल ५०१ हरकती बुधवारी (दि. ९) एका दिवसात पालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत. ही संख्या पाहता येत्या दोन-तीन दिवसांत विक्रमी संख्येने अर्ज येण्याची दाट शक्यता आहे.
पूर्वीचे सर्वच्या सर्व प्रभाग कमी अधिक प्रमाणात फुटले आहेत. विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागाची मोडतोड झाल्याने हक्काचे मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाले आहेत. एकूण सुरुवातीच्या चार दिवसांत १२ हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या. मंगळवारी (दि. ८) ६५ हरकती जमा झाल्या. बुधवारी विक्रमी ५०१ हरकती जमा झाल्या आहेत. त्यामध्ये विद्यमान नगरसेवक, माजी राजकीय पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सार्वजनिक गणेश मंडळ व स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष यांचा भरणा आहे.
हरकतींमध्ये रेल्वेमार्ग, नाले ओलांडून, एकसंध वस्ती, सोसायटी, चाळ, कॉलनी तोडल्याबाबतचे आक्षेप आहेत. काही जणांनी न्यायालयात दाद मागण्यासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या सोमवारी (दि. १४) दुपारी तीनपर्यंत प्राप्त होणाऱ्या या सर्व हरकतींवर २५ फेब्रुवारीला एका दिवसांत सुनावणी होणार आहे.












