- महापालिका भवनात २५ फेब्रुवारीला होणार मतदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) :- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी दिली.
महापालिकेमध्ये कर्मचारी महासंघ ही मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेचे ६ हजार २०० सभासद आहेत. कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीची सन २०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठीची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीसाठी अर्जही
दाखल झाले होते. परंतु, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्याने निवडणूक पुढे ढकलली होती. शहरातील कोरोनाची रूग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
पॅनल प्रमुखांची निवड व चिन्ह वाटप १४ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. तर, महापालिका भवनात २५ फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होईल. त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.