न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२२) :- देशातील करोना रुग्णआलेख घसरला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली.
करोना निर्बंधांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे ‘‘देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख २१ जानेवारीपासून घसरलेला दिसतो. गेल्या आठवडय़ात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ५०,४७६ इतकी नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत २७,४०९ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात करोना चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ३६३ आढळले’’ याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
‘‘करोना रुग्णवाढीनंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमा आणि विमानतळांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले. सार्वजनिक आरोग्य संकटाला तोंड देताना या उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र राज्यातील प्रवेशद्वारांवर तेथील सरकारांनी लागू केलेल्या अतिरिक्त निर्बंधांमुळे प्रवास आणि आर्थिक व्यवहारांना अडथळा येऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी,’’ असे राजेश भूषण यांनी या पत्रात म्हटले आह़े
सध्या देशभरात दैनंदिन रुग्णसंख्या घटत असल्याने राज्यांनी तेथील करोनास्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घ्यावा आणि ते कमी करावेत, असे निर्देश देताना केंद्राने परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचे निर्बंध नुकतेच शिथिल केल्याचा दाखला राजेश भूषण यांनी पत्रात दिला आहे. करोना नियंत्रणाबरोबरच नागरिकांचे जीवन आणि उपजीविकेवरील करोनाचा दुष्परिणाम कमीत कमी असेल, यावर भर देण्याची गरज असल्याचा पुनरूच्चार राजेश भूषण यांनी या पत्रात केला.