- उपकरणं, साहित्य आणि औषधांची खरेदी त्वरित करता येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२२) :- महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांना उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधे खरेदी करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. त्यानुसार, पाच लाख रुपये आगाऊ रकमेचा खर्च करण्याचे अधिकार वाबळे यांना देण्यात आले आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधांची खरेदी करण्यात येते. त्यासाठी आता मंजुरींची वाट पहावी लागणार नाही.
दहा लाख आणि पाच लाख रुपयांपर्यंत खरेदीचे अधिकार यापूर्वी महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय संचालक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना प्रदान केले होते; परंतु या अधिकाऱ्यांना दिलेले हे खरेदीचे अधिकार रद्द केले. दि . २५ ऑक्टोबर २०११ रोजीच्या आदेशानुसार, नव्याने विभागप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानुसार वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांना विभागप्रमुख म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार, डॉ. वाबळे यांच्या कार्यकक्षेत वायसीएम रुग्णालयाचे कामकाज आहे. कार्यालयीन रक्कम खर्च करण्याचे अधिकार अधिष्ठाता यांच्या नावाने करण्यात येणार आहे.