न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहा आणि पंधरा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ती त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. तब्बल सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ३ हजार ८८२ गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.
दहावीत ८० ते ९० टक्के प्राप्त विद्यार्थ्यांना १० हजार आणि ९० टक्क्याहून अधिक गुण मिळालेल्या मुलांना १५ हजार आणि बारावीच्या परीक्षेत ८० टक्के प्राप्त विद्यार्थ्यांना महापालिकेच्यावतीने दरवर्षी १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यंदाच्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने पालिकेने अर्ज मागवून थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात आरटीजीएस केले आहे.
योजनेसाठी ५ हजार १४२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अजूनही ५६२ लाभार्थी लाभापासून दूर आहेत. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याने पालकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.