- संवाद यात्रेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांसोबत बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू आहे. ती यात्रा शनिवारी (दि. २६) पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल होणार आहे. या यात्रेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पक्ष संघटनेचा आढावा घेऊन, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे यांनी गुरुवारी (दि. २४) पत्रकार परिषदेत दिली.
खराळवाडीतील पक्ष कार्यालयात झालेल्या परिषदेला माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते योगेश बहल, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, फजल शेख, विजय लोखंडे, भाऊसाहेब भोईर, विनायक रणसुभे, पाटील आदी उपस्थित होते.
गव्हाणे यांनी सांगितले की, मोशी येथील गणेश बॅक्वेट हॉल येथे शनिवारी सकाळी दहापासून परिवार संवाद होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, खा. अमोल कोल्हे, आ. अण्णा बनसोडे, आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील हे सकाळी दहाला पिंपरी मतदारसंघ, अकराला चिंचवड आणि दुपारी बारा वाजता भोसरी मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर शहर कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. शहरातील पक्ष संघटनेच्या कामाची माहिती ते घेणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.


















