- खुनाचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींच्या बांधल्या मुसक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खून आणि खुनी हल्ल्याचे दोन किंवा त्यापेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या ३८ सराईत गुन्हेगारांना पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने एकाच दिवशी ताब्यात घेतले आहे. सराईत गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांना दिले होते.
खून आणि हल्ल्याचे ज्या सराईतांवर गुन्हे दाखल आहेत त्यांची यादी तयार केली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजताच्या दरम्यान गुंडा विरोधी पथकाने ८७ सराईत गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यातील १९ खूनातील आरोपी आणि १९ खुनीहल्ल्यातील आरोपी असे एकूण ३८ सराईत गुन्हेगार सध्या काय काम करीत आहेत किंवा ते बेकार आहेत? याची माहिती गुंडा विरोधी पथकाने घेतली.
सराईत गुन्हेगारांचा ई – मेल आयडी, फेसबुक, इंस्टाग्राम, स्वतःचा, जवळच्या मित्राचा व नातेवाइकांचा मोबाइल नंबरही पोलिसांनी आपल्या रेकॉर्डवर घेतला. तसेच जेलमधून सुटून आल्यावर या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे का, याचीही माहिती पोलिसांनी घेतली, अशी माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने यांनी दिली.












