- ठिकठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अडवणूक केल्याचा ठेवला ठपका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिक्युअर आयटी सोलुशन कंपनीचा जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला, शहरातील अनधिकृत फ्लेक्स, मनपामध्ये जुन्या ठेकेदारांचे भाजपच्या पदाधिका-यांबरोबर संगनमत या विरोधात मी वेळोवेळी महानगरपालिके सभागृहात आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. याबाबत पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती आणि मला वेळोवेळी डावलण्याचे त्यांचे धोरण होते. त्याच्या निषेधार्थ मी गुरुवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे असे प्रतिपादन नगरसेवक तुषार कामठे यांनी केले.
शुक्रवारी (दि. २५) पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तुषार कामठे यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर आणि मनपातील भ्रष्टाचारी अधिका-यांवर टिका केली.
यावेळी ते म्हणाले की, पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती, तरीही त्याकडे मी दुर्लक्ष करून सर्वांचा सन्मान करत होतो, कचऱ्याच्या समस्यासाठीचे आंदोलन असेल, दारूचे दुकान बंद करण्यासाठीचे आंदोलन, अनधिकृत फ्लेक्सच्या विरोधात आंदोलनात तर माझ्यावरच गुन्हा दाखल केला. जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवणे असो, जे काही शक्य होत ते सर्व मी गेली पाच वर्षे करत होतो. पण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माझ्या भाजप पक्षाचे शहरातील नेते, पदाधिकारी किंवा आमदार यांचे कधीच सहकार्य लाभले नाही, उलट माझी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अडवणूकच करण्यात आली. भ्रष्टाचाराबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता त्यांनी तात्काळ ह्या विषयात कारवाईचे आदेश दिले.












