- पालिकेकडून ई – वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- महापालिका प्रशासनाने २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ई – वाहनांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन व पॉइंट उभारणे, सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी आदींचे नियोजन केले आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन – कॅप) अंतर्गत त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे.
महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह ८ प्रभाग कार्यालये, ८ जुनी आणि ४ नवीन रुग्णालये, मोशी कचरा डेपो, मैलाशुद्धीकरण प्रकल्प, १०५ प्राथमिक शाळा आणि १८ माध्यमिक शाळा, १४ मैलाशुद्धीकरण केंद्रआदी ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.
‘ एन – कॅप ‘ अंतर्गत शहर बृहद आराखड्यामध्ये (अॅक्शन प्लॅन) या बाबींचा समावेश आहे. टंडर अर्बन सोल्युशन संस्थेकडे हे काम सोपविले आहे. हा अॅक्शन प्लॅन राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यांच्यामार्फत तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाबाबत पुढील कार्यवाही होऊ शकणार आहे, अशी माहिती पालिकेचे पर्यावरण विभागाचे सह – शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.












