- आय.एस.ओ. मानांकन प्राप्तीच्या कामाचा घेतला आढावा..
- परिमंडळ अधिकारी दिनेश तावरेंच्या कामाचे कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२२) :- निगडी येथील संत तुकाराम व्यापार संकुलातील अन्नधान्य वितरण कार्यालय परिमंडळ ‘ ज ‘ विभागास पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांनी नुकतीच भेट दिली. दक्षता समिती सदस्यांची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या बैठकीस अ व ज विभागाचे परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.
सर्व सामान्य जनतेला शिधापत्रिकेच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणे व सर्व मुलभुत सुविधा नागरीकांना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी विभागातील पुरवठा शाखेच्या (आय.एस.ओ. ९००१-२०१५) मानांकनासाठी वेळोवेळी बैठका घेऊन याबाबत सूचना व मार्गदर्शन केले आहे.
याबाबत माहिती देताना परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे म्हणाले, आय.एस.ओ. मानांकन प्राप्तीसाठी कार्यालयात जय्यत तयारी सुरु आहे. अटी शर्तीनुसार कार्यालयाचे नुतनीकरण व अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे कामकाज केले जात आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरीकांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, तक्रारपेटी, प्रथमोपचार, दिव्यांग व वयोवृध्द नागरीकांसाठी विशेष बैठक व्यवस्था, शिधापत्रिका अर्जदार यांना त्यांचे अर्ज भरण्याकरीता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शिधापत्रिकेबाबत अद्यावत माहिती फलक बसवण्यात आले आहेत. ऑनलाईन रेशनकार्ड तपासणीसाठी एक खिडकी योजना, तक्रार नोंदवही, अभिप्राय नोंदवही, कार्यालयीन भेट पुस्तिका आदीबाबत काम सुरु आहे. बँकेच्या टोकनप्रणाली प्रमाणे शिधापत्रिका अर्जदारांनादेखील टोकण देण्यात येणार आहे. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येऊन नागरिकांना शिस्त लागेल; शासकीय कामाच्या वेळेचीदेखील बचत होणार आहे.
आमदार आण्णा बनसोडे यांनी कामकाजाची पाहणी केली. आय.एस.ओ ९००१-२०१५ च्या मानांकनासाठी सुरु असलेल्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.