- किती कोटींची उड्डाणे घेणार; उत्सुकता शिगेला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची सभा सोमवारी (दि. २८) सायंकाळी पाचला आयोजित केली आहे. सभेसमोर पाणीपुरवठा, उद्यान रस्ते, स्वच्छता, स्थापत्य, ड्रेनेज आदी प्रमुख कामांचे प्रस्ताव आहेत. तसेच, ऐनवेळी अनेक कामांना उपसूचनेद्वारे मंजुरी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
स्थायी समितीच्या १६ पैकी शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे (सर्व भाजप), पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर (दोघी राष्ट्रवादी काँग्रेस) या ८ सदस्यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपणार आहे. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये यांचा समावेश आहे. तर, उर्वरित समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, सुजाता पालांडे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे (सर्व भाजप), प्रविण भालेकर, राजू बनसोडे (दोघे राष्ट्रवादी) व मीनल यादव (शिवसेना) या ८ सदस्यांचा कार्यकाळ महापालिका १३ मार्चला बरखास्त होत असल्याने त्या दिवशी संपणार आहे.
पंचवार्षिकेचा कार्यकाळ संपणार असल्याने तसेच, केंव्हाही निवडणूका जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहेत. त्यामुळे सोमवारच्या सभेला महत्व आहे. विषयपत्रिकेवरील एकूण ३६ विषयांसह आयत्यावेळी अनेक प्रस्ताव आणून त्यांना मंजुरी देण्याचा धडाका लावला जाण्याची शक्यता आहे. अनेक नगरसेवक व समिती सदस्य आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी धडपडत आहेत. कामांना स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यास काम करणे सुलभ होते. तसेच, निवडणुकीत त्या कामांचे श्रेय घेता येते. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी कामांचे प्रस्ताव पूर्ण करून ते समितीसमोर सादर करण्याचे नियोजन करून ठेवले आहे. दरवर्षी अखेरच्या सभेला १ हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या कामांना मंजुरी दिली जात असल्याचे अनुभव आहे. त्यामुळे या सभेत समितीकडून किती कोटींपर्यंत उड्डाण केले जाते, याची उत्सुकता लागली आहे.












