- आयुक्त असणार कारभारी; राज्य शासनाचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेवरती प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी आज गुरुवारी (दि. ३) रोजी काढला आहे.
महापालिकेची मुदत १३ मार्च रोजी संपत आहे. मुदत संपायला केवळ दहा दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर सत्ताधारी भाजपची पंचवार्षिकीची मुदत संपुष्टात येऊन पालिकेवर प्रशासक राज येणार आहे. पालिकेचा कारभार आयुक्त पाहणार आहेत.
ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न आणि प्रभाग रचनेचा मुद्दा हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच कोरोनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडसह काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणूका पुढे ढकलण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
या आधीही २०२० मध्ये पाच महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. यामध्ये औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिकांची मुदत संपली आहे. कोरोनाच्या कारणास्तव या पाचही महानगरपालिकावरती राज्य सरकारने प्रशासक नेमला आहे. आता आगामी दहा महानगरपालिकांवर प्रशासक नेमण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.


















