- थकीत बिलाऐवजी उपलब्ध रक्कम भरण्यास आयुक्तांचा हिरवा कंदील…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- मिळकतकराच्या संपूर्ण बिलाऐवजी उपलब्ध असलेली रक्कम नागरिकांना भरता येणार आहे. या सुविधेमुळे थकीत शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर नागरिकांना भरता येणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्षांतील मार्चच्या अखेरच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात भरणा होईल, अशी अपेक्षा महापालिकेच्या कर संकलन विभागाने व्यक्त केली आहे.
कर संकलन विभागाच्या वतीने मिळकतकर वसुली मोहिम सुरू आहे. त्याअंतर्गत एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
कारवाईच्या वेळेत नागरिकांकडे बिलाची पूर्ण रक्कम नसते. अशा वेळी उपलब्ध असलेली रक्कम भरून घेण्याची विनंती केली जाते. नागरिकांच्या अडचणीचा विचार करून कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल करण्यात आला आहे. त्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना थकीत शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरता येईल. तसेच, थकबाकीची मोठी रक्कम टप्पाटप्प्याने भरता येणार आहे.


















