न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार बीआरटीएस स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गेल्या सव्वादोन वर्षांपासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराला दररोज पाणी देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सहशहर अभियंता लडकत यांच्या काळामध्ये आंद्रा आणि भामा आसखेड धरणामधून अतिरिक्त पाणी आणण्यासाठी काम सुरू करण्यात आले.
डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत १०० एमएलडी आणून संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, ते नियोजन फसले. त्यातच लडकत हे २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले. त्यांची जबाबदारी सहशहर अभियंता सवणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.


















