न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२२) :- थकीत वीजबिलांचा भरणा करीत नसलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात आली आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे,यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्वच दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.
महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील प्रत्येक दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी संबंधित कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार मार्च महिन्यातील सर्वच शनिवारी,रविवारी तसेच शुक्रवारी ( दि. १८ ) या सार्वजनिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा व पथदिवे आदी ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी आहे. महावितरणकडून कृषी व अकृषी वर्गवारीतील एकूण ९ हजार ९८७ कोटी ६८ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांच्या वसुलीला वेग देण्यात आला आहे. अतिशय आर्थिक अडचणीत तथापि वारंवार आवाहन करूनही भरणा करीत नाही, अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरु केली आहे.
















