- विविध भागातील विकासकामांचे होणार उदघाटन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने विविध भागात विकासकामे करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतच नगरसेवकांचा कालावधी संपणार असून कारभार प्रशासकांच्या हाती जाणार आहे. यामुळे सध्या शहरात विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पणाचा धडाका सुरू करण्यात आला आहे. रविवारी (दि. ६) माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथे रविवारी मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार आहे. त्या कार्यक्रमानंतर फडणवीस यांचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये दौरा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजल्यापासून शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
पिपळे निलख येथील बाणेर पुलाजवळील नव्याने विकसित झालेले शहीद अशोक कामटे उद्यानाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर अडीच वाजता ग क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. थेरगाव येथे सेक्टर नंबर २२ येथे खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे. पिंपरी मोरवाडी येथे नवीन विरंगुळा केंद्र, केएसबी चौकात अण्णासाहेब पाटील स्मारक उभारण्यात आले आहे. त्याचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली म्युझिकल फाउंटन उभारण्यात आले आहे. पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान, साईनाथनगर येथील उद्यानाचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे भोसरी येथील कुस्ती केंद्र व बोपखेल येथील बहुद्देशीय इमारतीचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शहरामध्ये अनेक विकासकामे झाली. त्यातील काही विकासकामांची उद्घाटने व लोकार्पण राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात येणार आहे. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही आमंत्रित केले आहे. – नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते…
















