- येत्या पाच दिवसात विद्यमान नगरसेवकांची मुदत संपुष्टात…
- उपसूचना व निधी वर्गीकरणाचे प्रस्ताव आयुक्त स्वीकारणार की फेटाळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२२) :- विविध ५८९ कामांच्या एकूण १ हजार ५८ कोटींच्या तरतुदीतील निधीत चढ व घट करीत सन २०२२-२३ वर्षाच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजुरी दिली. तो अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला. परंतु, सर्वसाधारण सभाच होणार नसल्याने आयुक्त राजेश पाटील यांच्या अधिकाऱ्यांमध्ये अर्थसंकल्प मंजूर होऊन तो लागू होणार आहे.
महापालिका प्रशासनाने मूळ हजार ९६१ कोटी ६५ लाखांचा आणि केंद्र व राज्य शासनाचा निधी धरून एकूण ६ हजार ४९७ कोटी २ लाखांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर १८ फेब्रुवारीला सादर केला. अर्थसंकल्पाच्या निधीत कोणतीही वाढ न करता विविध कामांत घट व वाढ स्थायी समितीने सुचविले. विविध लहान व मोठ्या अशा एकूण ५८९ कामांच्या एकूण १ हजार ५८ कोटींच्या चढ व घट करण्याचा निर्णय समितीने २३ फेब्रुवारीला घेतल . उपसूचनेद्वारे अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला. मात्र, महापालिकेची फेब्रुवारी २०१७ ची पंचवार्षिकची मुदत १३ मार्चला संपत असून, त्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी अर्थसंकल्पासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आलेले नाही. परिणामी, रविवार (दि. १३) पर्यंत सर्वसाधारण सभा होणार नाही. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांच्या अधिकार कक्षेत अर्थसंकल्प मंजूर करून तो लागू केला जाईल, असे चित्र स्पष्ट आहे.
स्थायी समितीने अर्थसंकल्पास भरमसाट उपसूचना दिल्या आहेत. सत्ताधारी भाजपने आपल्या सोयीनुसार वर्गीकरणाचे प्रस्ताव दिले आहेत. ती नवी कामे, उपसूचना व निधीचे वर्गीकरणाचे प्रस्ताव आयुक्त राजेश पाटील हे स्वीकारणार की कात्री लावणार, याची उत्सुकता आहे.


















