- वाकड, ताथवडे, पुनावळेतील नागरिकांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२२) :- थेरगाव विभागाच्या विभाजनातून स्वतंत्र वाकड विभागीय करसंकलन कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. थेरगाववरील ताण कमी होऊन वाकड, ताथवडे पुनावळेकरांना स्वतंत्र कार्यालयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून या नूतन कार्यालयाचे मंगळवारी उदघाटन झाले. यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, सहायक मंडल अधिकारी राजाराम सरगर, मुख्य लिपिक अरुण चौधरी आदी उपस्थित होते.
याठिकाणी मुख्य लिपिक, चार कनिष्ठ लिपिक, चार शिपाई अशा नऊ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यालयातर्गत वाकड, ताथवडे, पुनावळे गावातील साठ हजार मिळकतीचे १९१ कोटी २० लाख महसूल संकलित होणार असून, काही महिन्यात अन्य नवीन तीन हजार मिळकतींची दफ्तरी नोंद होणार असल्याने महसुलात वाढ होणार आहे.
स्वतंत्र वाकड करसंकलन विभागाच्या निर्मितीसाठी राहुल कलाटे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून महापालिका प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता.


















