- महापौर माई ढोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) :- शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पण पुरेसे पाणीपुरवठा केला. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारी २०२२ पासून शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करायचा होता. पुरेशा दाबाने पाणी दिले. त्यामुळे एकाही महिलेचे पाणी टंचाई बाबत तक्रार आली नाही. पण, तो होऊ शकला नाही, अशी खंत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केली.
पिंपरी – चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवारी संपत आहे. उद्या शनिवार, रविवारी महापालिकेला सुटी आहे. नगरसेवक आणि महापौरपदाचा कार्यकाळ संपणार असल्याने महापौर उषा ढोरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. उपमहापौर घुले, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, महापौरपदी मला २४ महिने काम करण्याची संधी मिळाली. निवड होताच कोरोनाची महामारी आली. कोरोना काळात दिवसरात्र काम करुन नागरिकांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. सक्षम वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासनानेही कोरोना महामारीत चांगले काम केले. त्यामुळेच शहरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी राहिला. कोरोनाने पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी उमेद जागर कार्यक्रम घेतला. त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले. शिवाय महापौरपदाच्या कार्यकाळात सुमारे १८७३ कार्यक्रमांना उपस्थिती लावली. तसेच, २९ महापालिका सभांचे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या २२ व्या ऑनलाइन वेबिनार सभेमध्ये देखील सहभाग घेतला. यासह शहरातील मैदाने, उद्यान, रस्त्यांच्या विकास कामांना वारंवार प्रत्यक्ष भेटी दिल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.












