- पीएमपीएलला महापालिका ना हरकत प्रमाणपत्र देणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रामध्ये दोन ठिकाणी व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. शहरातील निगडी व भोसरी टर्मिनल येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी पीएमपीएलला महापालिका ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याला महापालिकेच्या महासभेमध्ये गुरूवारी (दि. ६) महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
पीएमपीएलच्या ताफ्यात १५० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. तसेच येत्या वर्षांत ५०० इलेक्ट्रक बस दाखल होणार आहेत. या सर्व बससाठी शहरात चार्जिंग स्टेशन उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरामध्ये दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. नवनगर विकास प्राधिकरणाकडून मनपाच्या ताब्यात आलेल्या भक्ती शक्ती येथील अण्णाभाऊ साठे बस स्थानक येथे एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
तसेच बीआरटीएस विभागाचे भोसरी टर्मिन्स याठिकाणी एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये १ ऑक्टोबर २०२० मध्ये धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाच्या वापरातील या दोन जागांवर इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिका ना हरकत प्रमाणपत्र देणार आहे. त्यास आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली.
















