न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- राज्य शासनाच्या विविध विभागांप्रमाणे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या भरती प्रक्रियेत देखील खासगी कंपनीचा सहभाग असणार आहे. महापालिकेने गट अ ते क वर्गातील विविध १२८ पदांसाठी अर्ज मागविले होते. त्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा राज्य शासनाच्या आदेशानुसार टीसीएस ही खासगी कंपनी घेणार आहे.
पालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट अ ते क संवर्गातील १२८ रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. एकूण १९ हजार १५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्य शासनाने भरतीसाठी नियुक्त केलेल्या यापूर्वीच्या कंपन्याचे पॅनेल रद्द केले आहे. यापुढे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
पालिकेने या तीन कंपन्यांकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी दर मागविले होते. त्यापैकी टीसीएस या कंपनीने प्रति उमेदवार ४३० रुपये शुल्क घेण्याची तयारी दर्शविली. त्यानसार भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षेचे कामकाज टीसीएस कंपनीकडून केले जाणार आहे. त्यासाठी ८१ लाख ७६ हजार ४५० रुपये आणि जीएसटी असा खर्च अदा केला जाणार आहे. या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी स्थायी समितीमध्ये मान्यता दिली आहे.
या पदांसाठी होणार भरती…
वैद्यकीय अधिकारी १३ पदे, प्राप्त अर्ज २००, स्टाफ नर्स ७० पदे प्राप्त अर्ज ९९९६, सांख्यिकी सहायक ३ पदे प्राप्त अर्ज ४३९ ,लॅब टेक्निशियन १ पद प्राप्त अर्ज १९, एक्स – रे टेक्निशियन ३ पद प्राप्त अर्ज २७०, फार्मासिस्ट ७ पदे प्राप्त अर्ज ३८९७, एएनएम ३१ पदे प्राप्त अर्ज ४०२२, एकूण १२८ जागांसाठी १९०१५ प्राप्त अर्ज.
















