- बॉम्ब शोधक व नाशक पथकाचा शोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- वडमुखवाडी, चऱ्होली येथे १२ डुक्कर बॉम्ब सापडले आहेत. शुक्रवारी (दि. ८) सकाळी मयत राधा हिच्या आईला आणखी दोन डुक्कर बॉम्ब परिसरात दिसून आले. ही माहिती तिने आपल्या पतीला दिली. पतीनेही याबाबत पोलिसांना कळविले असता दिघी पोलीस आणि पुण्यातील बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी या परिसरात शोध घेतला असता त्यांना पुन्हा १२ डुक्कर बॉम्ब मिळून आले. सदरचे बॉम्ब फेब्रुवारी महिन्यातील त्या घटनेच्या वेळीचे असावेत, अशी शक्यता दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे यांनी व्यक्त केली.
सुपारी एवढ्या आकाराच्या दोरा गुंडाळलेली वस्तू फोडत असताना चऱ्होली, वडमुखवाडीतील अलंकापुरम सोसायटीजवळच्या नानाश्री हॉटलेमागे गाईच्या गोठ्याजवळ ५ फेब्रुवारी २०२२ रोजी डुक्कर बॉम्बचा स्फोट होऊन राधा गोकुळ गवळी (वय ५ वर्षे) या बालिकेचा मृत्यू झाला होता. हे बॉम्ब येथून जवळच राहणाऱ्या झोपडीतील दोन तरुणांनी तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार येथील झोपड्याही उठविण्यात आल्या आहेत.