- ध्येयनिष्ठ शाळा व शिक्षकांचा होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव..
- मेस्टाचे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप काटे यांचे संस्थाचालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) वार्षिक अधिवेशन १९ एप्रिल रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील इंग्लिश माध्यमातील शाळांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे जिल्हा मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संदीप काटे यांनी संस्थाचालकांना केले आहे.
मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि ऑस्ट्रेलियाचे केंद्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संदीप काटे यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
या अधिवेशनात राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांपुढे असलेल्या विविध अडचणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू असलेले डिजिटल शिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि पालकांसोबत समन्वय ठेवण्यासाठी खास चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात मेस्टाकडे १८ हजाराहून अधिक शाळांची नोंदणी असून त्यातील प्रत्येक तालुका, जिल्हा स्तरावरीत हजारो प्रतिनिधी या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षात परिस्थितिशी दोन हात करुन आपण सर्वांनीच कुठल्या ना कुठल्या मार्गाने महाराष्ट्रातीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण दिले, शाळाही जगवल्या व शैक्षणिक नुकसानही होऊ दिले नाही. अशा शाळा व शिक्षकांचा सत्कार तर सोडाच परंतु उलट बदनाम करण्याचेच प्रयत्न जास्त झाले. म्हणून या वर्षी ‘मेस्टा वार्षिक अधिवेशन २०२२’ मध्ये मान्यवरांच्या हस्ते कर्मठ ध्येयनिष्ठ शाळा व शिक्षकांचा मेस्टा एक्सलेट ट्रस्टी अवार्ड, मेस्टा एक्सलंट स्कूल अवार्ड, मेस्टा एक्सलंट प्रिंसिपल अवार्ड, मेस्टा एक्सलंट टीचर अवार्ड, मेस्टा कोवीड वाँरीअर अवार्ड देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी पिंपळे सौदागर येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन काटे यांनी पत्रकादवारे केले आहे.