न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी धडक पथकाच्या वतीने शहरातील विनापरवाना फ्लेक्सवर शुक्रवारी (दि. १५) कारवाई करण्यात आली. शहरातील शेकडो फ्लेक्स व फलक पथकाने जप्त केले.
महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शहरात अनेक ठिकाणी छोटे – मोठे फ्लेक्स लावण्यात आले होते. माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, चौक, पदपथ, इच्छुक, सार्वजनिक मंडळ व संस्थांनी विनापरवाना रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागेत, बसथांबे, इमारत, सीमा भित, नामफलक, ग्रेडसेपरेटर, बॅरिकेट्स, झाडे आदी ठिकाणी फ्लेक्स लावले होते. त्यामुळे शहर फ्लेक्समय झाले होते.
पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौकात तर, फ्लेक्सची अक्षरश: गर्दी झाली होती. त्यामुळे पादचाऱ्यांना ये – जा करणे गैरसोयीचे झाले होते. शहरातील सर्व फ्लेक्सवर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. सर्व फ्लेक्स काढून जप्त करण्यात आले. ते फ्लेक्स नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडिमय येथील गोदामात जमा करण्यात आले आहेत.
















