- ब्रीथ अॅनलायझरच्या वापराबाबत वाहतूक पोलिस मागविणार तज्ज्ञांची मते..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२२) :- करोना महामारीमुळे ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई गेली दोन वर्ष बंद होती. मात्र आता करोनाचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई सुरू करण्याची तयारी वाहतूक पोलिसांनी केली आहे.
करोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करताना अर्थात ब्रीथ अॅनलायझरचा वापर पोलिसांनी करु नये, असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून १६ मार्च २०२० रोजी जारी करण्यात आले होते. ड्रंक अँड डाईव्हची केस करताना वाहतूक शाखेचा पोलीस एकाच ब्रीथ अनलायझरमधून दिवसभरात अनेकांची तपासणी करतो, एकाच्या तोंडासमोर धरलेले उपकरण, दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या असे अनेकांच्या तोंडासमोर पोलिसांना तपासणीसाठी धरावे लागते. तसेच पोलीस कर्मचारी हे उपकरण स्वत:जवळमं बाळगत असतो. तपासणी दरम्यान एखादा करोना बाधित रुग्ण सापडल्यास करोनाचा विषाणू ब्रीथ अॅनलायझरच्या माध्यमातून अनेकांपर्यंत प्रसारित होऊ शकतो. हा धोका लक्षात आल्याने पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची तपासणी बंद करण्यात आली होती. तसेच ब्रीथ अॅनलायझरचा वापर करणे थांबविण्यास सांगितले होते.
गत दोन वर्षांपासून दारु पिऊन वाहन चालविताना चालक आढळल्यास त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. मात्र, आता करोना रुग्णांची संख्या कमी झाली. तसेच शासनानेही १ एप्रिल पासून निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे पूर्वीप्रमाणे ब्रीथ अनलायझरचा वापर करून ड्रंक अॅण्ड डाईव्हची कारवाई सुरू करता येईल का, याबाबतची चाचपणी सध्या वाहतूक पोलीस करीत आहेत.
शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आगामी काळात ब्रीथ अॅनलायझरचा वापर करून ड्रंक अँड डाईव्ह कारवाई करता येईल का, याबाबत आम्ही तज्ज्ञांचे मत मागविणार आहोत. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यास लवकरच ब्रीथ अॅनलायझरचा वापर करून ड्रंक अॅण्ड डाईव्ह कारवाई सुरू केली जाईल.
– आनंद भोईट, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग…
















