- पाच लाखांचा गांजा जप्त; महिलेला अटक, एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२२) :- निगडीतील ओटास्कीम येथे एक महिला गांजा विकत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान सिद्धार्थ नगर, झोपडपट्टी ओटास्कीम येथे छापा मारून कारवाई केली.
आरोपी महिला ही गांजा विकत असल्याचे पोलिसांना आढळले. तिच्याकडून ७१ हजार ७५ रुपये किमतीचा दोन किलो ७९३ ग्राम गांजा जप्त केला. हा गांजा तिने कुणाकडून आणला याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता तिला हा गांजा विक्रीसाठी एकाने व्यक्तीने दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस नाईक प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्या घरावर छापा मारला. दरम्यान पोलीस आल्याचे लक्षात आल्याने आरोपी पळून गेला. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात पाच लाख ३४ हजार ५० रुपये किमतीचा २१ किलो ३६२ ग्राम गांजा आढळून आला. दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी २४ किलो २०५ ग्राम गांजा जप्त केला.
सावळा शिवाजी खाडे, शारदा रामा जाधव (वय २५) ( दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा जाधव या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.