- प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची निर्मिती?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२२) :- दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यातील महापालिकांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकास्तरीय टास्क फोर्स स्थापन करावा, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. महापालिकामध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यास बजाविले आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील तर, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त घनकचरा विषय हाताळणार आहेत. विभागप्रमुख हे सदस्य सचिव राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी, शिक्षण अधिकारी, समाज विकास अधिकारी, प्रमुख विधि सल्लागार, जनसंपर्क अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हास्तरावरील अधिकारी आणि जिल्हा उद्योग अधिकारी सदस्य म्हणून राहणार आहेत.
या टास्क फोर्सवर महापालिका आयुक्त आवश्यकतेनुसार अतिरिक्त सदस्य नियुक्त करू शकणार आहेत. महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या उपाययोजना करण्यासाठी नोडल विभाग म्हणून कार्य करणार आहे.
टास्क फोर्स आणि कचरा व्यवस्थापन कक्षाची कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांच्या अंमलबजावणीसाठी आणि शहर स्तरावरील विविध विभाग यांचे समन्वयित प्रयत्न आणि संसाधनासह एक सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. शहरातील निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे मूल्यमापन करून त्याचे संकलन, धोरण आखावे लागणार आहे.
















