- सुट्टीच्या दिवशी होतेय गर्दी; उद्घाटनाचा केवळ फार्सच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२२) :- पुणे मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातून पहिल्याच दिवशी ३७ हजारांहून अधिक लोकांनी प्रवास केला होता; मात्र सध्या मेट्रोकडे हौशी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. सोमवारी (दि. २५) पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान धावणाऱ्या मेट्रोत प्रवासी खूप कमी होते. त्यामुळे शहरवासीयांची मेट्रोची हौस भागल्याचे चित्र आहे.
लोकांचा वेळ आणि पैसा वाचावा तसेच त्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान व्हावा, यासाठी मेट्रोची सुरुवात करण्यात आली; मात्र कामे अर्धवट असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली आहे. अवघ्या महिनाभराच्या कालावधीतच मेट्रोच्या प्रवाशांत तब्बल ९० टक्क्यांनी घट झाली आहे. फक्त शनिवार, रविवार गर्दी होतेय.
१३ मार्चला ६७ हजारांपर्यंत गेलेला प्रवाशांचा आकडा एक महिन्यानंतर अवघा २-३ हजारांवर आला आहे, ही परिस्थिती अशीच राहिली तर मेट्रो सेवा तात्पुरती बंद करावी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पिपरी – चिचवड शहरात पिपरी स्थानक ते फुगेवाडी दरम्यान सध्या मेट्रो धावते. सोमवारी दुपारी १२.०५ मिनिटांनी पिपरी स्थानकांवरून सुटलेल्या मेट्रोत अवघे ३५-३७ प्रवासी होते. तीच मेट्रो फुगेवाडी स्थानकांवरून परतली तेव्हा त्यात फक्त १५-१७ प्रवासी होते. उद्घाटनावेळी गाजावाजा केलेल्या इ – रिक्षा आणि सायकली पडून आहेत. स्थानकाबाहेरच बाइक आणि सायकल दिसत आहेत. मात्र त्या कार्यान्वित नाहीत. पहिल्या दिवसापासून बाइक, सायकली धूळ खात आहेत.
















