- प्रभागरचना व नकाश क्षेत्रीय कार्यालय व पालिका भवनात पाहता येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या त्रिसदस्यीय प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. १२) मंजुरी दिली. येत्या मंगळवारी (दि. १७) प्रभागरचनेचा अंतिम आराखडा सर्व क्षेत्रीय कार्यालयासह महापालिका भवनात लावण्यात येणार आहेत. तसेच पालिकेच्या www.pcmcindia. gov.in या संकेतस्थळावरही आराखडा पाहता येणार आहे.
महापालिकेकडून त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आला. त्यात तीन सदस्यांचे ४५ व चार सदस्यांचा एक असे एकूण ४६ प्रभाग आहेत. एकूण १३९ नगरसेवक संख्या आहे. त्यातील एकूण ६९ जागेवर महिलांचे आरक्षण असणार आहे. अनुसूचित जातीच्या २२ व अनुसूचित जमातीचे जागा आहेत, तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी ११४ जागा आहेत. त्या आराखड्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या. तब्बल हजार ६८४ हरकती व सूचनांवर २५ फेब्रुवारीला प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात आला होता. मात्र राज्य सरकारकडून स्थगिती आल्याने तो तसाच पडून होता.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मेच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भातील कामकाज पुन्हा सुरू केले. त्यानुसार पालिकेने प्रभागरचनेचे कामकाज बुधवारी (दि. ११) पूर्ण केले. प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभागरचनेच्या अंतिम आराखडा आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांच्यासमोर गुरुवारी सादर करण्यात आला. त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून, त्यास मंजुरी दिली आहे. तो अंतिम झालेला आराखडा मराठी व इंग्रजी भाषेत शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करून येत्या मंगळवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्व ८ क्षेत्रीय कार्यालय व पालिका भवनात प्रभागरचना व नकाश लावले जाणार आहेत. त्यावर हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.