- पनवेलमधून दोघांना नाट्यमयरित्या अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२२) :- मोक्काच्या गुन्ह्यात महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी पनवेल येथून अटक केली. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली. राजन ऊर्फ बबलू रवी नायर आणि निखिली ऊर्फ डोक्या अशो गाडुते (दोघेही रा. जुनी सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी सांगवीत योगेश जगताप यांचा गोळ्या घालून खून केला होता. त्यानंतर या गुन्ह्यात मोक्काची कारवाई करण्यात आली. मात्र खून केल्यापासून आरोपी नायर आणि गाडुते हे दोघेजण फरार होते. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, असे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हे शाखेला दिले होते.
फरार आरोपी पनवेल येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस पनवेल येथे गेले. आरोपी इमारतीच्या २० व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये होते. पोसिलांनी बेल वाजवून दरवाजा उघडण्यास सांगितले असता आरोपी पाईपद्वारे खाली उतरू लागले. यात अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी १८ व्या मजल्यावरून आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींना सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.