न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे. २०२२) :- एका दुचाकीवरून दोन जणांना प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र दुचाकीस्वार या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२२ या चार महिन्यात वाहतूक पोलिसांनी १० हजार ७२० जणांवर कारवाई केली आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी २०२१ मध्ये नऊ हजार ४७ जणांवर कारवाई केली होती.
मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार एका दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे हा गुन्हा ठरतो. पूर्वी यासाठी दंडाची रक्कम जादा नव्हती. मात्र बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली.
नवीन कायद्यानुसार पहिल्यांदा दुचाकीस्वार ट्रिपल सीट आढळून आल्यास त्याच्याकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जातो. जर दुसऱ्यांदा तोच दुचाकीस्वार आढळून आल्यास त्यांच्याकडून तब्बल दीड हजारांचा दंड आकारला जातो. मोठ्या प्रमाणात दंड आकारणी केल्यास वाहतुकीला शिस्त लागेल, असा शासनाचा कयास होता. मात्र हा कयास पूर्णपणे फोल ठरला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. वाहन चालकांचा बेशिस्तपणा वाढतच चालला आहे.


















