- अर्जाचे भाग १ आणि २ हे टप्पे महत्वाचे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालये वगळता उर्वरित भागातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३० मेपासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २३ ते २७ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येईल.
सुधारित वेळापत्रकानुसार ३० मेपासून ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित करून घेता येईल. ३० मे ते राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करेपर्यंत उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी आणि दुरुस्ती करता येईल, शिक्षण उपसंचालकांना उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती प्रमाणित करता येईल.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येईल. त्यासाठीच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील असे नमूद करण्यात आले आहे. अधिक माहिती https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.