- पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची शरद पवारांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील वडमुखवाडी, चोविसावाडी येथील सर्व्हे क्रमांक ५८, ५९ मधील निवासी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र करून देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी दिले.
भोसरी येथे एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले होते. त्यावेळी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने क्षेत्र बदलण्याच्या मागणीचे निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी आश्वासन दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सदीप बेलसरे यांनी दिली. यावेळी संचालक संजय सातव तसेच स्विकृत संचालक माणिक पडवळ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सर्व ८० ते ९० उद्योजक हे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे आजीव सभासद आहेत. त्यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी चोविसावाडी येथील सर्व्हे क्रमांक ५८ व ५९ मधील जमिनी उद्योगधंद्यासाठी विकत घेतल्या. यातील काही प्लॉट्स हे १९९५ पूर्वी विकत घेतलेले असून ग्रामपंचायत चऱ्होली बु. यांनी या जागा औद्योगिक वापरासाठी परवानगी दिलेली आहे. या उद्योगांवर १० हजार कामगार अवलंबून आहेत. हा नियोजित ९० मीटर रस्ता झाल्यास सर्व उद्योजक व कामगार विस्थापित होतील. तसेच महाराष्ट्र शासनाच्या व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या नियोजित रस्त्याचा सर्वसमावेशक विचार करून तो रद्द करावा. त्याचा मार्ग बदलून पर्यायी जागा द्यावी. तसेच निवासी क्षेत्र बदलून औद्योगिक क्षेत्र करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
















