- आंबेडकरी जनतेतून महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२२) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, मा. उपायुक्त विकास ढाकणे, मा. महापौर माई ढोरे व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागची जागा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकासाठी जाहीर करण्यात आली.
आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, या गोष्टीला बराचसा वेळ उलटून गेला आहे. महापालिकेकडून स्मारकासंदर्भात कागदोपत्री कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे आंबेडकरी जनतेतून महापालिकेबद्दल नाराजी व रोष व्यक्त केला जात आहे.
महापालिकेमध्ये आता प्रशासकीय कारभार चालू आहे. त्यामुळे प्रशासक तथा आयुक्त यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाहीत. २७ जून रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. सर्व आंबेडकरप्रेमी जनतेची मागणी व इच्छा आहे, येत्या २७ जून रोजी प्रस्तावित स्मारकाचे आयुक्तांनी भूमिपूजन करून या स्मारकाची अधिकृतरित्या जाहीर घोषणा करावी. प्रस्तावित स्मारकात २७ जून रोजी मंडप उभारून त्या ठिकाणी माता रमाई यांना अभिवादन करण्यासाठी माता रमाई यांचा फोटो किंवा पुतळा तिथे ठेवण्यात यावा. माता रमाई यांच्या कार्याशी निगडित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
या आशयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंचचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील, मा. अतिरिक्त आयुक्त (१) विकास ढाकणे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांना दिले आहे.