- कामासाठी निविदा प्रसिद्ध; ७ एकर जागेत १३ मजली इमारत साकारणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ बांधण्यात येणार आहे. ती १३ मजली पर्यावरणपूरक इमारत असणार असून, त्यासाठी ३१२ कोटी २१ लाख खर्च अपेक्षित आहे. प्रशासकीय राजवटीत या कामासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी चौकात असलेली महापालिकेची सध्याची मुख्य प्रशासकीय इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे क्रीडा, पशुवैद्यकीय, एलबीटी विभाग इतरत्र ठिकाणी कार्यरत आहेत. दैनंदिन कामकाज करण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला होता. त्यासाठी गांधीनगर, पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून ‘ आयटूआर ‘ अंतर्गत मिळालेल्या जागेपैकी २४ हजार ५४४ चौरस मीटर जागेत नऊ मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सर्वसाधारण सभेनेही मंजुरी दिली. त्यासाठी २४६ कोटींचा खर्चाची निविदाही काढण्यात आली. मात्र, इमारत दर्शनी भागात नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या जागेत इमारत बांधण्यास नापसंती व्यक्त केली. त्यामुळे ते ठिकाण रद्द करण्यात आले.
एच. ए. कंपनीची जागा ताब्यात येण्यास खूपच विलंब होणार असल्याने तो पर्यायही रद्द केला. त्यानंतर चिंचवडच्या ऑटो क्लस्टरसमोरील सायन्स पार्कजवळील ३५ एकर जागेपैकी ७ एकर जागेत १३ मजली प्रशस्त पर्यावणरपूरक इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे.