न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व सर्वसाधारण खुला गटातील (ओपन) जागेसाठी महिला आरक्षण सोडत येत्या मंगळवारी (दि. ३१) सकाळी अकरा वाजता चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढली जाणार आहे. एकूण १३९ जागांपैकी महिलांच्या ७० जागा कोणत्या हे त्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
त्रिसदस्यीय ४६ प्रभाग रचनेला १२ मे रोजी आयोगाची अंतिम मंजुरी मिळाली. प्रभागरचना १३ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना महापालिकेस सोमवारी (दि. २३) प्राप्त झाल्या. त्यानुसार मंगळवारी काचेच्या भरणीत चिठ्ठया टाकून विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढली जाईल. सोडतीचे छायाचित्रिकरण केले जाणार आहे.
प्रथम एससीच्या एकूण २२ जागांपैकी महिलांसाठी ११ जागांची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर एसटीच्या एकूण ३ जागांपैकी महिलांच्या २ जागांची सोडत निघेल, एससी एसटीच्या एकूण २५ जागांच्या चिठ्ठया बाजूला ठेवल्या जातील. उर्वरित ११४ जागांतून सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांच्या ५७ जागांची चिठ्ठी काढली जाईल. त्यासाठी प्रथम प्रभागातील ‘ अ ‘ जागेवरील चिठ्ठया जातील. त्यानंतर ‘ ब ‘ जागेवरील चिठ्ठया निघतील, उर्वरित राहिलेल्या जागा या सर्वसाधारण खुला गटासाठी असतील. एका प्रभागात जास्तीत जास्त दोन महिलांच्या जागा आरक्षित असणार आहेत. एक प्रभागात सर्वच्या सर्व तीन महिलांचे आरक्षण काढले जाणार नाही. तिसरी जागा ही शिल्लक असलेल्या त्या – त्या गटाच्या खुल्या वर्गासाठी असेल. सांगवी प्रभाग क्रमांक ४६ मध्ये चार जागा आहेत. त्यात दोनच जागा महिलांसाठी राखीव असतील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कार्यक्रम आखला जाणार आहे. शुक्रवारी (दि. २७) सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.


















