- विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार भाषा विषयांच्या पुस्तकांचा संच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२२) :- विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत, असे महापालिकेने नियोजन केले आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत बाल भारतीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ८८ हजार ५९६ पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार बालभारतीकडून पालिका शिक्षण विभागास पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे.
यंदा १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळणार आहेत. शालेय साहित्य खरेदी करण्याची महापालिकेच्या शिक्षण विभागाची लगबग सुरू आहे. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विना अनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिली जातात. यासाठी शिक्षण विभागाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी बालभारतीकडे पुस्तकांची मागणी केली आहे. त्यानुसार ८८ हजार ५९६ पुस्तके बालभारतीकडून महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डीच्या उन्नत केंद्रावर आली आहेत.
येत्या काही दिवसात केंद्रावरून ती विविध विविध शाळांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. या पुस्तकांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतची मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी या चार विषयांची पुस्तके आली आहेत. यामध्ये मराठीची ७७ हजार ४८७, उर्दूची ३ हजार ५३७, हिंदीची २ हजार १२० आणि इंग्रजी विषयांची ५ हजार ४५२ अशी ८८ हजार ५९६ पुस्तके आली आहेत.