न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- मंकीपॉक्स विषाणूचे नवे संकट येण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा भाग म्हणून पिंपरी – चिंचवड महापालिकेने उपचारासाठी स्वतंत्र वार्ड करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नायजेरियाला प्रवास करून परतलेल्या व्यक्तीला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्याने नवीन आजाराचे संकट येण्याची शक्यता आहे.
या अनुषंगाने उपाययोजना म्हणून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने शहरातील आरोग्य आणि वैद्यकीय विभागांशी संवाद साधला. नवीन आजाराविषयी चर्चा केली. या बैठकीनंतर महापालिकेच्या वैद्यकीयआणि आरोग्य विभागाच्या वतीने तयारी सुरू केली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ” हा आजार नवीनच आहे. त्यामुळे माहिती घेण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या वतीने दक्षतेची उपाययोजना म्हणून आपण एका रुग्णालयात वॉर्ड सुरू करणार आहोत. मात्र, कोणत्या रुग्णालयात वॉर्ड सुरू करायचा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज करण्यात येईल.
काय आहे मंकीपॉक्स?..
मंकीपॉक्स हा एक जुनोसिस आहे, ज्याचा अर्थ असा आहे की, हा संसर्ग झालेल्या प्राण्यापासून मानवांमध्ये पसरणारा रोग आहे. मंकीपॉक्समुळे कांजण्यांसारखी लक्षणे दिसतात. पण ती कमी गंभीर आहेत. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी, शरीरावर सूज, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवू शकतो. यामध्ये कांजण्यांसारखे पुरळ संपूर्ण शरीरावर येतात. हा विषाणू फाटलेली त्वचा, श्वसनमार्ग, डोळे नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतो.