न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२२) :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात २५ मे ते ५ जून २०२२ या कालावधी दरम्यान “प्लास्टिक मुक्त शहर विशेष मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या दुस-या दिवशी सकाळी आयुक्त पाटील यांच्या उपस्थितीत लिंकरोड चिंचवड येथील यशोपुरम सोसायटी परिसरातील मोकळ्या जागेत प्लॉगेथॉन मोहीम पार पडली.
यावेळी सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह संस्कार प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचे स्वयंसेवक, नागरिक आदी सहभागी होते.
दरम्यान, आयुक्त पाटील यांच्या उपस्थितीत नद्या, नाले, निसर्ग प्लास्टिकमुक्त करण्याची आणि शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी आयुक्त यांच्या सोबत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिक गोळा केला.
अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बिजलीनगर ग्रेडसेपरेटर्स गंगानगर मार्ग ते दळवी नगर उड्डाणपूल परिसरात प्लॉगेथॉन मोहीम पार पडली. यावेळी आयुक्त पाटील यांच्यासह, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरोडे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग चे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, बेसिक्स संस्थेचे स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, नागरिक आदी सहभागी होते.
यानंतर महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सकाळी १०.३० वाजता “प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती पदयात्रा” काढण्यात आली. सबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिका-यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या पदयात्रेत क्षेत्रीय कार्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध अशासकीय संस्थाचे स्वयंसेवक, सामाजिक संघटनांचे सदस्य, विद्यार्थी, नागरिक आदी उपस्थित होते.